Pune News : अविनाश भोसले यांच्या मुलाला ताब्यात घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईला रवाना

एमपीसी न्यूज : पुण्यातील बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. काल सकाळी सुरू झालेली कारवाई बुधवारी मध्यरात्री पर्यंत सुरू होती. दरम्यान या कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी अविनाश भोसले यांच्या मुलाला ताब्यात घेतले असून ते बुधवारी मध्यरात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. 

अविनाश भोसले यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात बुधवारी सकाळपासून ईडीचे अधिकारी ठाण मांडून बसले होते. ईडीने यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांवर छापेमारी केली आहे. त्यानंतर आता बांधकाम व्यवसायिक ईडीच्या रडारवर आहेत. अविनाश भोसले यांच्यावर यापूर्वीही फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने कारवाई केली होती.

दरम्यान बुधवारीं ईडीकडून करण्यात आलेली कारवाई विदेशी चलन प्रकरणी व काही महागड्या वस्तू परदेशातून आणल्याप्रकरणी सुरू असल्याचे समजते. यापूर्वी 2007 मध्ये अशाच प्रकारची चौकशी करण्यात आली होती. आयकर विभागाकडूनही अविनाश भोसले यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत छापेमारी करण्यात आली होती. तर नोव्हेंबर २०२० मध्येही भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक आहेत. ते अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक असून कॉंग्रेसचे नेते व माजी वनमंत्री पंतगराव कदम यांचे व्याही आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.