Dehuroad News : उभ्या पिकात पोकलेन व जेसीबी मशीन घालून पन्नास वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड तोडले

घराचे कुलूप तोडून दीड लाखांचे नुकसान केले

एमपीसी न्यूज – उभ्या पिकामध्ये पोकलेन आणि जेसीबी मशीन घालुन पन्नास वर्षांपूर्वीचे शेतातील आंब्याचे झाड तोडले. त्यानंतर घराचे कुलूप तोडून घरातील दीड लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले. ही घटना सात जुलै रोजी दुपारी रावेत येथे घडली.

स्वप्निल सुदाम केजळे (वय 33, रा. रावेत) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश पंढरीनाथ पाटील (वय 48), सोमनाथ मोरेश्वर भोंडवे (वय 44), अमोल काशिनाथ भोंडवे (वय 35), कुणाल कैलास भोंडवे (वय 37, सर्व रा. रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांची रावेत येथे 78 आर जमीन आहे. त्यातील 39 आर जमीन विकसन करण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपी निलेश पाटील यांना दिली. 48 महिन्‍यात विकासन करण्याची मुदत होती. मात्र मुदतीत विकसन न झाल्याने फिर्यादी यांनी ती जमीन अन्य आरोपींना दिली. परंतु अन्य आरोपींनी देखील वेळेत विकासन न करता फसवणूक करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे दस्त करून घेतले. ही बाब फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर दस्त व्यवहार रद्द करण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात स्पेशल दिवाणी दावा दाखल केला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

सध्या फिर्यादी सदर शेत जमिनीत वहिवाट करीत आहेत. त्यामध्ये त्यांनी पीक लावले आहे. असे असताना सात जुलै रोजी आरोपी जेसीबी ट्रक सह फिर्यादी यांच्या शेतात दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान आले. आरोपींनी उभ्या पिकात बळजबरीने पोकलेन व जेसीबी मशीन घालून पिकाचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या शेतात असलेले पन्नास वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड तोडले. जमिनीचे सपाटीकरण करून माती दुसरीकडे टाकली. फिर्यादी यांच्या शेतात असलेल्या घराचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर, डेस्कटॉप, वायफाय मशीन असे दीड लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.