Pimpri News: ‘नो पार्किंग’मध्ये दुचाकी, चारचाकी पार्क करताय; मग तुमच्या खिशाला कात्री नक्की!

'नो पार्किंग'मध्ये दुचाकी पार्क केल्यास 236 तर चारकीस 472 रुपये दंड भरावा लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात फेल गेलेल्या पार्किंग पॉलिसीचे महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी पुरनरुज्जीवन केले आहे. नो पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुचाकी नो-पार्किंगमध्ये पार्क केल्यास 200 रुपये आणि जीएसटी 36 असे 236 रुपये तर हलकी चारचाकी नो-पार्किंमध्ये पार्क केल्यास 400 रुपये आणि जीएसटी 72 असा 472 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 1 एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी केली. याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकाच्या आज (मंगळवारी) झालेल्या पहिल्याच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग पॉलिसीची 1 जुलै 2021 पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. ही पार्किंग पॉलिसी राबविताना मार्किंग केलेल्या ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहन धारकांकडून पार्किंग शुल्क घेण्यात येत होते. परंतु नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहन धारकांकडून कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे नो पार्किंगमध्ये लावण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पोलीस विभागाच्या मदतीने टोईंग व्हॅनद्वारे वाहने उचलण्याचे नियोजन करण्यात आले.

ही वाहने पोलीस विभागाच्या मदतीने पार्क करण्यासाठी तीन ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये निगडी भक्ती शक्ती उड्डाणपुला खालील जागा, पिंपरी इंदिरा गांधी पुलानजीक मोकळी जागा आणि चिंचवड एस के एफ कंपनी समोरील वाहतूक पोलीस चौकी नजीकच्या जागेचा समावेश आहे. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करताना नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी महापालिकेमार्फत पुरविण्यात आलेली टोईंग व्हॅन व इतर यंत्रणेचा 1 लाख 85 हजार आणि जीएसटी प्रति सेट इतका वसुल करुन तो ठेकेदाराला दिला जाईल. तर, उर्वरित सर्व रक्कम पोलिसांना द्यावी असे 14 फेब्रुवारी 2022 रोजी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांच्या मागणीनुसार उर्वरित रक्कम देण्याचे निश्चित झाले. 19 फेब्रुवारीपासून पार्किंग पॉलिसीची प्रभावीपणे अंमलबजावणी चालू करण्याचे निश्चित झाले.

नो पार्किंगमध्ये लावण्यात येणा-या वाहनांवर दंड आकारण्याचे नियोजन केले. दुचाकी नो-पार्किंगमध्ये पार्क केल्यास 200 रुपये आणि जीएसटी 36 असे 236 रुपये तर हलकी चारचाकी नो-पार्किंमध्ये पार्क केल्यास 400 रुपये आणि जीएसटी 72 असा 472 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. भांडार विभागामार्फत सामान्य पावती पुस्तक वाहतूक पोलिसास पुरविण्यात येणार आहे. दंडाची रक्कम महापालिका कोषागरात जमा करुन त्यातून टोईंग व्हॅनच्या ठेकेदारास 1 लाख 85 हजार रुपये रक्कम अदा केली जाणार आहे. तर, उर्वरित सर्व रक्कम पोलीस विभागास दिली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.