Pune News : पुण्यात केवळ 3 टक्के कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याचा सकारात्मक परिणाम समोर येत आहे. लसीकरणामुळेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत 95.65 टक्के रुग्ण लक्षणेविरहीत व सौम्य लक्षणे असलेले आहे. तर केवळ 3.35 टक्के रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत.

गतवर्षी जानेवारी महिन्यात देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली. आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, प्रोढ, तरुण अशा वयोगटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस दिली गेली. शहरात सुमारे 36 लाख 48 हजार 859 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 27 लाख 87 हजार 217 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसीचा पहिला डोस घेतलेल्या 6 हजार 495 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांपैकी 19 हजार 851 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये लसीकरणामुळे कोणतीही लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेले कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत शहरात 22 हजार 503 सक्रिय रुग्ण होते. त्यातील तब्बल 21 हजार 525 (95.65 टक्के) रुग्ण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन) आहेत. तर 978 (3.35 टक्के) रुग्ण  रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात दाखल होणार्‍या अनेक रुग्णांना गंभीर आजार आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.