IPL 2022 : गुजरातला विजेतेपदासाठी पाहिजेत केवळ 131 धावा!

एमपीसी न्यूज : विवेक कुलकर्णी : बटलर सह (IPL 2022) सर्वच प्रमुख फलंदाजांचे अपयश आणि गुजरात संघाच्या सर्व गोलंदाजांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी यामुळे राजस्थान रॉयल्सला गुजरात संघाने गुढग्यावर बसवले आणि केवळ 130 धावात रोखून अर्धी बाजी मारली आहे. आता आपल्या आतापर्यंतच्या दमदार कामगिरीला लखलखते सोनेरी कोंदण देण्यासाठी 120 चेंडूत फक्त 131 धावा करण्याचे तुटपुंजे आव्हान त्यांच्या पुढे आहे.

आपल्या पदार्पणातल्या स्पर्धेत थेट अंतीम फेरी गाठून सर्वाना प्रभावीत करणारा हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन जिंकणार की 2008 साली ही स्पर्धा जिंकलेले राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकून आपल्या माजी कर्णधार आणि जगातल्या सर्वोत्तम फिरकीच्या जादूगाराला श्रद्धांजली अर्पण करणार या उत्सुकतेने टाटा आयपीएल 2022 चा आजचा अंतीम फेरीचा आणि पंधराव्या विजेतेपदासाठीची औत्सुकपूर्ण लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवली गेली. ज्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,संजूने आजच्या सामन्यात बंगलोरवर दणदणीत विजय मिळवणारा संघच कायम ठेवला तर हार्दिक पंड्याने अल्झारी जोसेफच्या जागेवर लॉकी फर्ग्युसनला संघात स्थान देण्याचा एकमेव बदल केला.

साखळी स्पर्धेत 14 पैकी 10 सामने जिंकून अंकतालिकेत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या गुजरात संघाने राजस्थान रॉयल्सला साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात 37 धावांनी तर पहिल्या कॉलीफायर सामन्यात 7 गडी राखून पराभूत केले होते, या धर्तीवर गुजरातचे राजस्थान रॉयल्सवर बऱ्यापैकी मानसिक दडपण होते खरे पण टी-20 काय किंवा एकंदरीतच क्रिकेटमधे भूतकाळापेक्षा वर्तमानाला जास्त महत्व असते. त्यामुळे या दोन्ही पराभवाची सव्याज परतफेड करत राजस्थान रॉयल्स बाजी मारणार की आपल्या विजयी अभियानाला अभेद्य ठेवत गुजरात ही स्पर्धा संस्मरणीय करणार याची उत्सुकता तमाम (IPL 2022) आयपीएल क्रिकेट रसिकांना आज होती.

Lions FA : 4 लायन्स एफए, स्निग्मय ‘ब’ संघांने मिळवला सहज विजय

824 धावांसह 4 शतके करुन ऑरेंज कॅपचा मानकरी असलेल्या बटलर तर 26 विकेटस मिळवून पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या राजस्थान रॉयल्सकडे कर्णधार संजू, देवदत्त पडीकल, युवा यशस्वी जैस्वालसह अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन, हेटमायर, रियान पराग असे खतरनाक खेळाडू, तर ट्रेंट बोल्ट, कृष्णा असे आग ओकणारे गोलंदाज आहेत. तर, गुजरात संघाकडे गील, साहा, तेवतीया सह स्वतः हार्दिक पंड्या शमी, मिलर, रशीद खान असे एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्याने हा सामना अतिशय रंगतदार होईल अशी अपेक्षा सर्वानाच होती.

युवा प्रतिभावंत यशस्वी आणि या स्पर्धेवर आतापर्यंत आपले अधिराज्य करणारा जॉस बटलरने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. तर, गुजरात टायटन संघाकडून मोहम्मद शमीने आपले आक्रमण सुरू केले. पहिले षटक अप्रतिम फेकताना मोहम्मद शमीने फक्त 2 धावा दिल्या. यानंतर मात्र यशस्वी जैस्वालने जबरदस्त आक्रमक होत काही आकर्षक फटके मारत सुरुवात बरी करत आशा दाखवली. पण, हीच अतिआक्रमकता त्याला नडली आणि एक अतिशय देखणा षटकार मारल्यानंतरही दुसरा तसाच षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि यश दयालने त्याची 22 धावांची छोटी पण स्फोटक खेळी संपवली. त्याने 16 चेंडूत 2 षटकार मारत या धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने बटलरला (IPL 2022) साथ देताना सावधगिरीने सुरुवात केली. पण पहिल्या पॉवरप्लेवर गुजरात टायटनचाच वरचष्मा राहिला.

Khashaba Jadhav Sports : खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

त्यांच्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सला पहिल्या षटकात 1 गडी गमावून 44 धावाच करता आल्या. त्यानंतरही संजूला आपल्या किर्तीला साजेसा खेळ करता आला नाही, तो नाहीच. त्यामुळेच त्याच्यावर दडपण आले आणि ते झुगारून देण्याच्या नादात तो आपली विकेट गुजरातच्या कर्णधाराला देवून तंबूत परतला. यावेळी राजस्थान रॉयल्सची धावसंख्या 8.2 षटकात 2 बाद 60 अशी होती. अशीच दमदार कामगीरी करत गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर दडपण कायम ठेवले. ज्यामुळे पहिले दहा षटके संपल्यावरही राजस्थानला दोन गडी गमावून फक्त 71 च धावा करता आल्या.

त्याच्या जागी आलेल्या देवदत्त पडीकलला आजही विशेष काहीही करता आले नाही आणि दहा चेंडूत फक्त 2 धाव करुन तो रशीद खानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या हातात झेल देवून बाद झाला आणि 12 व्या षटकानंतरही राजस्थानची धावसंख्या 3 बाद 79 अशी नाजूक होती आणि यावेळीही गुजरातचेच पारडे वरचढ दिसत होते. आणि यावर कडी केली. ती कर्णधार पंड्याने, तेराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने जम बसलेल्या बटलरला बाद करून राजस्थान संघाच्या उरल्यासुरल्या आशा आकांक्षाही जवळजवळ खतम केल्या.

बटलरने 35 चेंडू खेळूनही फक्त 39 धावाच केल्या. या विकेटसच्या पतनाने राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित फलंदाजांना आलेले दडपण झुगारून देता आले नाही ते नाहीच. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला आपल्या निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून फक्त 130 धावाच करता आल्या. गुजरात संघाकडून पंड्याने कर्णधार म्हणून आघाडीवर राहत करीयर बेस्ट गोलंदाजी करत 17 धावा देत तीन महत्वपूर्ण बळी घेतले. त्याला साई किशोरने दोन तर रशीद, शमी, दयालने एकेक गडी बाद करत उत्तम साथ दिली. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सला फक्त 130 धावांची तुटपुंजी धावसंख्या उभारता आली.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स
9 बाद 130
बटलर 39,जैस्वाल 22 ,संजू 14,हेटमायर 11,पराग 15
पंड्या 17/3,साईकिशोर 20/2,दयाल 18/1,खान 18/1
फॉल ऑफ विकेट्स 1/31,2/60,3/79,4/79,5/94,6/98,7/112,8/130,9/130

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.