Pune News : पुण्यात गुन्हा दाखल असलेल्या कालीचरण महाराजांना अटक

एमपीसी न्यूज : महात्मा गांधीजीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अकोल्याच्या कालीचरण महाराजांना अखेर अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातील खजुराहो शहरातून कालीचरण महाराजांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

अकोल्याचे कालीचरण महाराज यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अपशब्दाचा वापर केल्याने त्यांच्या विरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले. राज्याच्या विधीमंडळातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

दरम्यान याच कालीचरण महाराजांसोबतच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह आणखी काही जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील नातुबाग परिसरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकावू वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.