Thergaon News: केजुबाई बंधारा फेसळला; रसायन मिश्रित पाणी सोडल्याची शंका

एमपीसी न्यूज – छायाचित्रे पाहिल्यास हे जम्मू काश्मीरचे चित्र आहे का, असे तुम्हाला वाटेल. पण, ते आपल्या  पवना नदीवरील थेरगाव येथील केजुबाई बंधाऱ्यातील चित्र आहे. जोरदार पाऊस पडत असतानाही बंधारा फेसळला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्यात फेस निर्माण झाला आहे. आजूबाजूच्या कंपन्यांनी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याची शंका व्यक्त केली जात असून याची चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस पडत होता. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. पाऊस जोरदार पडल्याने पवना नदीपात्र वाहत आहे. असे असतानाही थेरगाव येथील केजुबाई बंधारा फेसळला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्यात फेस निर्माण झाला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे पवना नदीची अवस्था खूपच दयनीय आहे. नदीपात्रात रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे फेस निर्माण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही छोटे व्यावसायिक केमिकलमिश्रित सांडपाणी पवना नदीत थेट सोडत आहेत का? याचा शोध महापालिकेने घ्यावा. विनाप्रक्रिया मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सर्व छायाचित्रे अरुण गायकवाड

 
नदीच्या परिसरात मोठया प्रमाणात शहरीकरण वाढले त्यामुळे ड्रेनेज व्यवस्था व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अपुरे पडत आहेत. घरगुती सांडपाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न करता नदीत मिसळल्याने नदी मध्ये फोम तयार होत आहे. घरगुती वापरातील साबण, डिटर्जेन्ट मध्ये अतिप्रमाणात असणाऱ्या फॉस्फेट सारख्या केमिकल मुळे असा फोम निर्माण होतो.  नागरिकांनी असा डिटर्जेन्ट वापर कमी करावा तसेच पर्यावरण पूरक उत्पादने वापरावीत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थानी आपल्या भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सर्व भागात पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करावे. रावेत, किवळे ताथवडे पुनावळे भागात प्रलंबित असणारे सांडपाणी प्रकल्प लवकर मार्गी लावावे आणि नदी संवर्धन करावे असे पर्यावरण अभ्यासक गणेश बोरा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.