Pimpri Crime News : नोकरीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून कागदपत्रे, त्यावर सह्या घेतल्या. त्या कागदपत्रांच्या आधारे एका कंपनीकडून कर्ज घेऊन दुचाकी खरेदी केली. ती दुचाकी परस्पर विकून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नेहरूनगर,पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश दशरथ पवार (वय अंदाजे 35), सतीश शिवाजी विटकर (वय अंदाजे 35, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचे वडील राजू शंकर भोसले (वय 63) यांना नोकरी लावतो असे अमिश दाखवून त्यांना विश्वासात घेतले. त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड अशी कागदपत्रे घेऊन काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या.

त्या कागदपत्रांचा वापर करून आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावे टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड या कंपनीकडून 76 हजार 399 रुपयांचे कर्ज घेतले. त्याद्वारे टीव्हीएस कंपनीची एक दुचाकी खरेदी केली. ती दुचाकी स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर विकून फिर्यादी यांच्या वडिलांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

63 हजारांना विकली दुचाकी

आरोपी आकाश पवार याने टीव्हीएस कंपनीची दुचाकी रमेशकुमार देवारामजी चौधरी (वय 38, रा. रावेत) यांना 63 हजार रुपयांना विकली. सेकंड ओनर म्हणून दुचाकी नावावर करून देतो असे सांगून त्याने चौधरी यांना विश्वासात घेतले. सुरुवातीला एक दुचाकी दिली. त्यानंतर ती परत घेऊन दुसरी दुचाकी चौधरी यांना दिली. मात्र चौधरी यांच्या नावावर दुचाकीचे रजिस्ट्रेशन करून न देता त्यांची 63 हजारांची फसवणूक केली. याबाबत चौधरी यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.