Pune News : “पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये..” चिठ्ठी लिहून मायलेकींची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकट्वाडी परिसरात मायलेकींनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना या ठिकाणाहून एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये ‘आजारपणामुळे होणारे आईचे हाल पाहवत नाहीत, आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नयेत, पोलिसांनी घरच्यांना त्रास देऊ नये’ असे लिहिलेले आहे. रेवा दत्तात्रेय खपाले (वय 24) आणि संगिता दत्तात्रय खपाले (वय 48) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षापासून संगीता खपाले या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे. किरकटवाडी परिसरात एका भाड्याच्या घरात एक मुलगा आणि दोघी मायलेकी राहत होत्या. आजारी असल्यामुळे संगीता यांना हालचाल करणेही कठीण होऊन बसले होते.

गुरुवारी नेहमीप्रमाणे घरातील तिघे जेवण करून झोपले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता त्याला बहीण व आईने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने खडकवासला परिसरात राहणाऱ्या बहिणीला ही माहिती दिली. मोठी बहीण घरी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना हा सर्व प्रकार कळवला.

हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.