Pimpri News : महापालिकेकडून तृतीय पंथीयांसाठी खास पीएमपीएमएल बस आणि पुणे मेट्रो राईडचे आयोजन

एमपीसी न्यूज – तृतीय पंथीयांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त अजय चारठणकर यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (दि. 22) तृतीयपंथी समाजासाठी खास पीएमपीएमएल बस व मेट्रो राईडचे आयोजन करण्यात आले.

उपायुक्त अजय चारठाणकर म्हणाले, तृतीयपंथीय समाजाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सहजतेने करावा यासाठी आज बस आणि मेट्रो सफरीचे प्रयोजन करण्यात आले. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे याकरिता महापालिका प्रयत्नशील आहे. येत्या काळात हा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. नागरिकांनी देखील या समूहाला सन्मानाची वागणूक दिल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभार लागेल.

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएमपीएमएल बसने भक्ती शक्ती, निगडी टर्मिनलवरून या सर्वाना पीसीएमसी मेट्रो स्टेशनपर्यंत आणण्यात आले. तिथून पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोची सफर घडवली. पहिल्यांदा मेट्रोत प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो अशी प्रतिक्रिया देत पालिकेच्या या उपक्रमाचे आणि आम्हांला समाजातील इतर घटकाप्रमाणेच सामावून घेतल्याबद्दल तृतीयपंथीयांनी आभार मानले.

पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मेट्रो स्टेशन, तेथील सुविधा, सूरक्षा याविषयी माहिती दिली. स्मार्ट सिटी टिमतर्फे पीसीएमसी स्मार्ट सिटी या शहराच्या अधिकृत ऍपची माहिती देण्यास आली तसेच या ऍमध्ये सर्वत्र लिंग निवडताना पुरुष, महिला, तृतीयपंथी असे तीनही पर्याय देण्यात आल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले.

 

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जागतिक ट्रान्सजेंडर दिनाच्या औचीत्यावर आयोजित कार्यक्रमात आयुक्त राजेश पाटिल यांनी तृतीय पंथीय नागरिकांसाठी प्रशासनामार्फत आर्थिक सक्षमीकरण योजना, सामाजिक उपक्रम राबवण्याचे व्हिजन मांडले. शहराचा आम्हीही एक घटक आहोत हा विश्वास या समाजात वाढीस लागेल अशी यामागची प्रशासनाची भूमिका आहे हे त्यांनी नमूद केले.

त्यालाच अनुसरून महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत बस व मेट्रो राईडचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यासाठी पीएमपीएमएलच्या सह व्यवस्थापकीय संचालक डॉ चेतना केरुरे, निगडी आगार प्रमुख, पुणे मेट्रोचे अधिकारी मनोजकुमार डॅनियल, अमोल मुदले, सामजिक संस्था मंथन आणि तृतीय फाऊंडेशन यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.