MLA Anna Bansode : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा फोन बंद आणि नेत्यांची धावपळ

एमपीसी न्यूज – विधानसभा आमदारांमधून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांकरिता आज (गुरुवारी) मतदान झाले. महाविकास आघाडी आणि भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली. त्यामुळे एका-एका आमदाराच्या मताला मोठे महत्त्व होते. पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांचा सकाळी फोन लागत नव्हता. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली. नेत्यांचीही धावपळ झाली. अखेरीस उशिराने बनसोडे यांनी विधानभवनात जात मतदानाचा हक्क बजाविला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती.  महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.  सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एका-एका मताकडे बारकाईने लक्ष दिले होते.

आमदार बनसोडे (MLA Anna Bansode) मुंबईत पक्षाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. आमदारांसोबत हॉटेलमध्ये देखील नव्हते. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली, तरी पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही मोठी धावपळ झाली. फोनाफोनी झाली. अखेरीस उशिराने आमदार बनसोडे यांनी विधानभवनात जात मतदानाचा हक्क बजाविला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

मी तर अजितदादांचा कट्टर समर्थक; नाराजी नाही – बनसोडे

याबाबत बोलताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, माझी तब्येत ठीक नसल्याने मी बैठकीला नव्हतो. याबाबत अजितदादांना सांगितले होते. दादांनीही आराम करण्यास सांगून आज मतदानाला बोलविले होते. त्यानुसार मी सकाळी अकरा, साडे अकराच्या सुमारास विधिमंडळात आलो. अजितदादा, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना भेटलो आणि मतदान केले. माजी नाराजी काही नव्हती. मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. त्यामुळे नाराजी कोणावर व्यक्त करणार आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.