Chinchwad News : सत्ताधारी भाजपने पाच वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील पाच वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी (दि. 6) दुपारी तीन वाजता अटलबिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णानगर संभाजीनगर चिंचवड येथे हे आंदोलन होणार आहे.

रविवारी राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. त्यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने विविध कामांचे उदघाटन आणि लोकार्पण केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक 11 पूर्णानगर येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी सव्वाचार वाजता नियोजित आहे.

दरम्यान या उद्यानाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या वतीने भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दुपारी तीन वाजता आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनासाठी शहरातील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विरोधात देखील हे जाहीर आंदोलन असणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी कळविले आहे.

त्यातच भर म्हणजे रविवारी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उदघाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.