Kalewadi News : बेकरीमध्ये 50 रुपयांवरून वाद घातल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथे केक खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाने 50 रुपयांवरून बेकरी चालकासोबत वाद घातला. बेकरी चालक, त्यांचे वडील आणि बहीण यांना दगड, गट्टूने मारहाण करत बेकरीची तोडफोड केली. हा प्रकार बुधवारी (दि. 10) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पाचपीर चौकात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सिद्धांत शिंदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह संकेत चौधरी, कृष्णा सोनवणे, रोहित उर्फ डॉग, शेखर उर्फ बाब्या (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी असद अख्तर अन्सारी (वय 31, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 11) सायंकाळी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत आणि फिर्यादी अन्सारी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी रात्री संकेत फिर्यादी यांच्या बेकरीमध्ये केक घेण्यासाठी आला. त्याने 200 रुपयांचा केक घेतला. 110 रुपये ऑनलाईन आणि 40 रुपये रोख दिले. मात्र उरलेले 50 रुपये नंतर देतो असे संकेत याने सांगितले.

मात्र फिर्यादी यांनी उधार केक देणार नसून पैसे मागवून घेण्यास सांगितले. याचा संकेतला राग आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तू मला आता केक दिला नाही तर तुला संपवून टाकतो’ अशी फिर्यादी यांना धमकी दिली. त्यांनतर त्याच्या अन्य चार साथीदारांना बोलावून फिर्यादी यांच्या बेकरीमधील काचा दगड व गट्टूने फोडल्या.

या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. बेकरीमध्ये आणि बेकारीच्या बाहेर असलेले नागरिक दहशहतीमुळे पळून गेले. आरोपी संकेत याने बेकरीच्या काउंटरची काच कोयत्याने फोडली. फिर्यादी, त्यांची बहीण आणि वडिलांना दगड व गट्टूने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सिद्धांत शिंदे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.