Pune Crime News : पोपट दाखवतो म्हणून नेले अन् रेल्वे ब्रीजवरुन नदीत दिले ढकलून

एमपीसी न्यूज – पुण्यात एका 15 वर्षीय मुलाला पोपट दाखविण्याच्या बहाण्याने घेऊन जात खडकी येथील रेल्वे पुलावरून खाली ढकलण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून या मुलाचे प्राण वाचले. दोन स्थानिक नागरिकांनी बोट नदीपात्रात नेऊन या मुलाला बाहेर काढले. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत निकाळजे (वय 19) असे गुन्हा दाखल करा तरडे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका पस्तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मुलगा दूध आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा गल्लीतच राहणाऱ्या प्रशांत निकाळजे या तरुणाने त्याला पोपट दाखवण्याच्या बहाण्याने रेल्वे ब्रिज वर नेले. या ब्रिज खाली पोपटाची पिल्ले आहेत असे त्याला सांगितले. त्यानंतर तो तरुण खाली वाकून पाहत असताना त्याला नदीत ढकलून दिले आणि पळून गेला.

दरम्यान नदीपात्रात पडलेल्या तरुणाने जवळच असणाऱ्या गवताला घट्ट धरून ठेवले आणि आरडाओरडा केला. त्यावेळी जवळून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्याचा आवाज ऐकला आणि त्याला सुखरूप बाहेर काढले. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.