Talegaon Dabhade : आईनंतर निरपेक्ष भावनेने पिढी घडविणारे फक्त शिक्षकच – डॉ. सलील कुलकर्णी

एमपीसी न्यूज -‘मातृदिन किंवा पितृदिना इतकाच शिक्षकदिनही महत्त्वाचा आहे. समाजात वावरताना, रस्त्याने जाता येता आपण अन्य ज्या त्रयस्थ व्यक्तीला झुकून वंदन करतो ती नक्कीच शिक्षक असते’ असे गौरोवोद्गार ज्येष्ठ गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी काढले.तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्यावतीने साजरा करण्यात आलेल्या शिक्षकदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कुलकर्णी बोलत होते.

यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, सदस्य चंद्रभान खळदे, विलास काळोखे, निरुपा कानिटकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य युवराज काकडे,डाॅशाळीग्राम भंडारी, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व साहित्यिक डॉ.संभाजी मलघे, बी फार्मसी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे, डी फार्मसीचे प्राचार्य डॉ.जी एस शिंदे, दशरथ जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात शिक्षकदिनाचा देखणा सोहोळा पार पडला.मागील दोन वर्षांत कोरोना महामारीच्या संकटामुळे शिक्षक दिन साजरा करता आला नाही, परंतु आजचा हा कार्यक्रम ही मधली पोकळी भरून काढणारा असल्याचे मत संस्थेचे खजिनदार शैलेशभाई शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.तसेच प्रमुख पाहुणे सलील कुलकर्णी यांच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे कौतुक करताना, दैनंदिन जीवनव्यवहारांत नात्यांमधील बारकावा डॉ. कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशीलपणे आपल्या लेखणीतून उतरविला असल्याचे नमूद केले.प्रमुख पाहुण्यांचा त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला साजेसा असा परिचय इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व कवी डॉ.संभाजी मलघे यांनी करून दिला.मराठी गीतांना वेगळा चेहरा देणारे नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून ख्यातनाम संगीतकार म्हणून सलील कुलकर्णी यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असल्याचे डॉ.मलघे आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या काही शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यात प्रा. के. डी. जाधव, प्रा.आर.एस.भुजबळ, डॉ. एस. के. सानप, शिल्पा सारंग पचगल, राजाराम मनोहर खुने, विनायक रा. गायकवाड, प्रा. राहुल नवनाथ जाधव, प्रा. शाम सूर्यकांत आवटे, प्रा.एम एम देशमुख, प्रा.ए.आर जाधव, डॉ. पी एस बोराडे तर शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये किशोर पंढरीनाथ शेवकर, गायत्री अमोल हिंगे, विजय अशोक मावळकर, मोनाली विनायक चासकर, अमोल ईश्वर कांबळे, बाळू अशोक वैद्य, श्रीमती सुवर्णा विठ्ठल गोरे, देवकुमार भिकाजी ओव्हाळ आदींचा सत्कार करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करण्यात आली.

भारतीय शिक्षणव्यस्थेच्या जागतिक संदर्भाना पुढे ठेवत ही परंपरा किती उच्च आणि प्रतिभावंतांना जन्म देणारी आहे त्यातून जगाला विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, आरोग्य,योग अशा अनेक विषयांची देणगी देणाऱ्या अनेक धुरीणांची उदाहरणे देत संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी नव्या शिक्षणदृष्टीला नजीकच्या काळात महत्त्व असल्याचे नमूद केले.संशोनाला प्रेरणा देणारी शिक्षणपद्धतीने शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा अनेक बाजूने विकास होत असतो असे मत यावेळी रामदास काकडे यांनी व्यक्त केले.

 

यावेळी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. तसेच आपल्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाच्या निर्मितीमागील अनेक मजेदार परंतु संवेदनशील गंमतीजमती आपल्या ओघवत्या वाणीत त्यांनी उलगडवून सांगितल्या. आपली भौतिक गरज आपले यश ठरवू शकत नाही तर आपले ज्ञान आणि आपलं सिद्ध होणं हेच आजच्या जगात महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांची पारख होते ती शिक्षकांमुळे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं गुणी होणं ही शिक्षकाची परीक्षा असते असे ते म्हणाले. यावेळी पालकत्वाच्याही अनेक पैलूंवर त्यांनी भर दिला.पालकत्व हे ओझं म्हणून घेऊ नये तर ती संधी म्हणून स्वीकारली तर त्यात जगण्याची खरी मजा आहे.आज हरवत चाललेला पालक-पाल्य हा संवाद पुन्हा होणे ही गरजेची बाब आहे असे सलील कुलकर्णी यांनी सांगितले.काही प्रसंग वाईट असतात.त्या प्रसंगांशी दोन हात कसे करायचे, त्यात निर्णय कसे घ्यायचे हे आजच्या मुलांना शिकविणे गरजेचे आहे.चांगले शिक्षक हे अगोदर चांगले श्रोते असले पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलेली कोणती ना कोणती गोष्ट त्यांना समजून घेता आली तर आजच्या बदलेल्या काळात विद्यार्थ्यांशी संवाद साधने सोपे होईल असे ते म्हणाले. आजच्या सोशल मीडियामुळे मुलांचे जगण्याचे संदर्भ बदलले, भूमिका बदलल्या, त्यातून काही प्रश्न, समस्या निर्माण झाल्या आणि हे सर्व शिक्षकांशी असलेल्या सुसंवादामुळे बदलू शकेल असा विश्वास डॉ. सलील कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती कन्हेरीकर व प्रा. संदीप भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.