Pimpri: वायसीएममधील शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यास कोरोना; लागण होऊनही कर्मचारी कामावर

Pimpri: Corona to an employee working in the autopsy department at YCM; Employees at work despite being infected कर्मचाऱ्याने वडिलांची शुश्रूषा करत शवविच्छेदन विभागात काम केले.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. घरातील व्यक्ती कोरोना बाधित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे कुटुंब क्वारंटाईन करणे गरजेचे असतानाही त्या कर्मचाऱ्याला कामावर बोलावण्यात आले. आता त्या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या वडिलांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. असे असतानाही महापालिकेने शवविच्छेदन विभागातील त्या कर्मचाऱ्याला कामावर बोलावले.

कर्मचाऱ्याने वडिलांची शुश्रूषा करत शवविच्छेदन विभागात काम केले. दरम्यान, त्या कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे त्याच्या संपर्कातील त्याचे सहकारी, डॉक्टर, पोलीस, रुग्णांचे नातेवाईक यांची पाचावर धारण बसली आहे.

महापालिका वैद्यकीय विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

कोरोनाच्या 70 टक्केहून अधिक जणांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सागितले होते. लक्षणे न दिसणारी व्यक्ती सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असू शकते, असे या विधानावरून स्पष्ट होते.

असे असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सरसकट सगळ्यांची कोरोना चाचणी करण्याएवजी प्रशासन केवळ लक्षणे दिसली तरच चाचणी करत आहे. यामुळे संबंधित व्यक्तीच्या घरातील सदस्यांना याचा धोका आणखी जास्त भेडसावतो आहे.

शवविच्छेदन करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही हे प्राथमिक स्वरूपात सांगणे कठीण आहे. तरीही शवविच्छेदन विभागातील कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.

कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यास तो मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यासाठी बोलविले जाते.

शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेकडून इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी तातडीने करणे गरजेचे होते.

मात्र कर्मचाऱ्यांनी मागणी करूनही महापालिकेने त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. तुमच्यात करोनाची लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे तुम्हाला टेस्टची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे.

त्या कर्मचाऱ्याने वडील कोरोना बाधित असल्याचे कळवले नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रशासनाला सांगितले नाही. त्यामुळे तो कर्मचारी कामावर होता, अशी प्रतिक्रिया वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांनी दिली आहे.

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाते. शवगृहातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या इतर सहका-यांची मागणी असेल तर त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, असेही अधिष्ठाता वाबळे म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.