Pimpri News : खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत वृद्धाकडून उकळले 18 लाख; महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बदनामी तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत एका महिलेने वृद्धाकडून वेळोवेळी 18 लाख रुपये बँक खात्यावर घेतले. याबाबत महिलेच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 384, 507 नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2017 ते 14 जुलै 2021 या कालावधीत घडली.

आरती मनोज पांचाळ उर्फ मंगल प्रकाश वाल्मिकी (वय 34, रा. विकासनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत आयनुद्दीन वीजर पटेल (वय 62, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. 14) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना भावनिक साद घालून वेळोवेळी घर खर्चासाठी पैशांची मागणी केली. आईचे पेन्शनचे पैसे आल्यावर तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाल्यावर घेतलेले पैसे परत करते असे सांगून महिलेने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर आरोपीने जास्त रक्कम मागितली. जास्त रक्कम देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने बदनामी करून तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. ई मेल व फोन संदेशाद्वारे वारंवार पैशांची मागणी करून तिच्या बँक खात्यावर 18 लाख रुपये घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.