Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा : अपडेट

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर सकाळी पावणे अकरा वाजता आगमन झाले आहे. पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास देखील करणार आहेत.

लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते कृषी महाविद्यालय येथे आले. तिथून पंतप्रधान पुणे महापालिका भवन येथे आले. प्रथम महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. उपरणे, फेटा आणि शिवप्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी काहींना पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उदघाटनासाठी रवाना झाले.

सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरवारे मेट्रो स्थानकात आगमन झाले. त्यांनी 12.2 किलोमीटर अंतरावरील मेट्रोचे उदघाटन केले. फुगेवाडी ते पीसीएमसी आणि वनाज ते गरवारे या दोन मार्गावरील मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते.

मेट्रो स्थानकावरील मेट्रो प्रकल्पाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचे उदघाटन करून त्याची माहिती मोदींनी जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी माहिती दिली. मेट्रो स्थानकावरील सुविधांची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल माध्यमातून मेट्रोचे तिकीट घेतले. तिकीट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. तिथे मेट्रोच्या अधिका-यांना नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तिकीट दाखवले.

मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. गरवारे ते आनंदनगर मेट्रो स्थानक दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दिव्यांग प्रवाशांसोबत संवाद साधला. पावणे बारा वाजता मेट्रो गरवारे स्थानकातून निघाली.

गरवारे मेट्रो स्थानकावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो प्रवासाबाबत अभिप्राय नोंदवला आणि ते एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणा-या सभेसाठी रवाना झाले.

दुपारी 12.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एमआयडीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनावर जल्लोष केला. 12.10 वाजता पंतप्रधान मोदी यांचे मंचावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’ असा जल्लोष केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.