Property Tax : ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्यकरात 30 सप्टेंबरपर्यंत 4 टक्के सवलत मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन (Property Tax) विभागाच्या वतीने 1 जुलै ते 30 सप्टेंबरअखेर मिळकत कराचा ऑनलाइन भरणा केल्यास सामान्यकरात 4 टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मिळकत धारकांनी ऑनलाइन कराचा भरणा करून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागातर्फे शहरातील मिळकतींना कराची आकारणी केली जाते. संगणक प्रणालीद्वारे मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिलातील सामान्यकरात विविध प्रर्वगांकरिता सवलती लागू आहेत. मात्र, विविध सवलती 30 जूनपर्यंत लागू होत्या. या सवलतींचा दोन लाख मिळकत धारकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये तब्बल 1 लाख 30 हजार मिळकत धारकांनी ऑनलाइन कर भरला आहे. त्यामुळे 250 कोटी रूपयांचा कर पालिका तिजोरीत जमा झाला आहे. 30 जूनपर्यंत ऑनलाइन कर भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी 5 टक्के सवलत देण्यात येत होती.

RTO Pimpri Chinchwad : पक्क्या परवान्यासाठी आरटीओचा मासिक दौरा

मिळकत कराचा ऑनलाइन भरणा वाढावा, ऑनलाइन (Property Tax) कर भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कर संकलन विभागाने ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी पुन्हा सवलत देण्याचा प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासक पाटील यांना सादर केला होता. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या तीन महिन्याच्या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्या मिळकत धारकांसाठी सामान्य करात 4 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 4 टक्के सवलत देण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करण्याबाबत पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.