Vikas Dhakne : प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक प्रमाणात होणे गरजेचे -विकास ढाकणे

एमपीसी न्यूज – प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक प्रमाणात होणे गरजेचे असून महामेट्रो आणि पीएमपीएमएल सारख्या सार्वजनिक वाहतुक सुविधांचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी केले.

महापालिकेच्यावतीने आणि महामेट्रोच्या सहकार्याने आज महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी मेट्रो सफर करून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासंदर्भातील संदेश दिला. नागरिकांनी देखील पर्यावरण समतोल राखण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

यावेळी, निवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांच्यासह सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. सुनील पवार, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापुसाहेब गायकवाड, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, स्मार्ट सिटीच्या सचिव चित्रा पंवार, जनसंपर्क अधिकारी सोयम अस्वार, समन्वयक अमोल देशपांडे आदी उपस्थित होते.

Kadbanwadi Oxygen Park : कडबनवाडीत लोकसहभागातून साकारतंय ऑक्सिजन पार्क

सुरवातीला पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारत ते पिंपरी चौक, फिनोलेक्स चौक अशा मार्गीकेद्वारे सायकल प्रवास करण्यात आला तसेच सायकलींसह पिंपरी ते फुगेवाडी अशी मेट्रो सफर करण्यात आली. मेट्रोचे समन्वयक अमोल दमणे यांनी मेट्रो सुविधांबद्दल यावेळी माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मेट्रो स्थानकांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.

शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छाग्रह अभियानात तसेच प्लास्टिक मुक्त शहर मोहिमेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून मेट्रो व्यवस्थापनाने देखील स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी यावेळी केली. दरम्यान, मेट्रो सफरीमध्ये सहभागी झालेल्या महापालिका प्रतिनिधींनी शहर स्वच्छता मोहिम यशस्वी करण्याचा संकल्प यानिमित्ताने केला.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दोन्ही शहरातील नागरिकांसाठी पीएमपीएमएल, मेट्रो रेल अशा सार्वजनिक वाहतुक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शहरातील वाहतुक कोंडी व वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी या दोन्ही प्रवासी वाहिन्यांचा नागरिकांकडून मोठया प्रमाणात वापर होणे गरजेचे असल्याचे मत अतिरीक्त आयुक्त ढाकणे (Vikas Dhakne) यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.