Pune News: विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागेत राष्ट्रीय स्मारक उभारावे : रामदास आठवले

एमपीसी न्यूज: भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून तेथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 50 ते 100 कोटींचा निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. राज्य सरकारने १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून विजयस्तंभ परिसरात भव्य स्मारक उभरण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

शनिवारी (ता. 1) 204 व्या शौर्य दिनानिमित्त रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
रामदास आठवले म्हणाले, “1 जानेवारी 1898 रोजी भीमा कोरेगाव येथे ५०० महार शूर सैनिकांनी महापराक्रम गाजवत 40 हजार पेशवे सैन्याला पराभूत केले होते. त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी अभिवादन करण्यास येत. आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास भावी पिढीला प्रेरणा देत राहील म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशामुळे दरवर्षी आंबेडकरी जनता भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यास येते.”

“1980 मध्ये आम्ही भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभा घेण्यास सर्वप्रथम सुरुवात केली. त्याकाळी लोक कमी येत होते. मात्र अलीकडच्या काळात भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो लोक येऊ लागले आहेत, याचा अभिमान आहे. या शौर्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी याठिकाणी स्मारक होण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. लवकरात लवकर स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भीमशक्ती एकत्र होणे गरजेचे आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.