दुबई विश्व काव्य संमेलनासाठी मावळातील शिक्षक कवी संजय जगताप यांची निवड

लोणावळा : मावळातील शिक्षक कवी संजय जगताप यांची दि.12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दुबई विश्व काव्य संमेलनासाठी निवड झाली आहे. दुबई मराठी साहित्य मंडळ व मुंबई स्नेहवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विश्व काव्य संमेलनामध्ये विविध देशातील साहित्यिक सहभागी होणार आहेत.

सदर दुबई विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.आनंद अहिरे हे असून विश्वसुंदरी संगीत खैरनार व प्रा. संघर्ष सावळे हे कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहेत. माय सॅक्रिड ट्रिप पर्यटन संस्थेच्या माध्यमातून दुबईतील पर्यटनही सर्व साहित्यिकांना करविले जाणार आहे. संजय जगताप यांनी आजतागायत अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांचे दीडशेहून अधिक लेख विविध वर्तमानपत्रे यामध्ये प्रकाशित झालेले आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मध्ये त्यांच्या कवितेची निवड झालेली आहे तसेच त्यात सूत्रसंचालन ही त्यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेले पाच पुस्तके प्रकाशित आहेत.  रेडिओ, आकाशवाणीच्या पाच केंद्रांवर त्यांचे कवितांचे कार्यक्रम झालेले आहेत शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड निर्माण करून त्यांचे अंकुर, उषःकाल, अक्षर फुले अक्षरधारा हे बालकाव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत. लेखनाबद्दल त्यांना राज्यस्तरावर पाच व राष्ट्रीय स्तरावर चार पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

सिंगापूर व इंडोनेशिया या देशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांची आंतरराष्ट्रीय दौऱ्यामध्येही निवड होऊन त्यांनी तो दौरा यशस्वी केला आहे. ते सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करत असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवित असतात. या साहित्य परिषद शाखेला राज्यातील उत्कृष्ठ शाखा म्हणून दोन वेळा गौरविण्यात आलेले आहे.

कला व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा नवी दिल्ली व उदयपूर राजस्थान या ठिकाणीही जगताप यांची भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी याआधी निवड झालेली होती. विश्व काव्य संमेलन दुबई साठी निवडीबद्दल मावळ तालुक्यासह सर्व साहित्यिक व रसिकांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.