Pimpri News : …तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारवाडा विकून खाल्ला असता; योगेश बहल यांची महापौरांवर टीका

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र महापालिका अधिनियमात शनिवारवाड्यासंदर्भात काही तरतूद असती. तर, पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी शनिवारवाडा आतापर्यंत विकून खाल्ला असता अशा शब्दांत माजी महापौर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी भाजपाच्या महापौर माई ढोरे यांच्यावर टीका केली आहे. महासभेचे आयोजन न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 18 फेब्रुवारी रोजी झालेली सर्वसाधारण सभा 17 मार्च 2022 पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 13 मार्च 2022 रोजी महापालिका विसर्जित होणार असल्याने 17 मार्च रोजची सर्वसाधारण सभा होणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार स्थायी समिती सदस्यांच्या वतीने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने विशेष महासभा बोलविण्याची मागणी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली होती. त्यावर महापौर माई ढोरे यांनी ‘राष्ट्रवादीचे सदस्य काहीही मागणी करतील, त्यांनी शनिवार वाडा द्या, म्हटले तर द्यायचा का?’ असे वक्तव्य केले होते. त्याला आता राष्ट्रवादीच्या वतीने माजी महापौर योगेश बहल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत बहल यांनी महापौरांना लेखी पत्र देऊन महापौरांच्या वक्तव्याचा खेद व्यक्त केला आहे. बहल यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायीच्या सदस्यांना अशी सभा बोलविण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र यावरून आपण अत्यंत दुर्देवी, बेजबाबदार आणि महापौरपदाची गरिमा घालविणारे वक्तव्य करून भाजपाकडून सुरू असलेल्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण कोणत्याही पक्षाच्या नसून या शहराच्या प्रथम नागरिक असल्यामुळे आपणाकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. आपण केलेले वक्तव्य हे संपूर्ण शहराचा अवमान करणारे ठरले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी तसेच नेत्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्यामुळे त्यांना सळो की पळो झाले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये सुरू आहेत.

मात्र बेजबाबदार वक्तव्य करून आपणही त्यांच्यामध्ये सामिल झाला याचा नक्कीच आम्हाला खेद वाटतो. या प्रकारांमुळे आपणही बिथरून गेल्या आहात का? हा प्रश्न नाईलाजाने विचारावा लागत आहे. भाजपाच्या इतर नेत्यांच्या बेताल वक्तव्याला आम्ही आमच्या व्यासपीठावर उत्तर तर देणारच आहोत. मात्र, आपण केलेले दुर्देवी वक्तव्य हे शहराचाही अवमान करणारे ठरणारे आहे. आपण ‘राष्ट्रवादीने शनिवारवाडा मागितला तर तो पण द्यायचा का’ अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे.

आम्ही शनिवारवाड्याची मागणी करायला नक्कीच अज्ञानी नाहीत. मात्र शनिवारवाड्याचा उल्लेख महापालिका अधिनियमात असता तर भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तो आतापर्यंत विकून खाल्ला असता. त्यामुळे आम्ही कायदेशीर बाबींच्या अधीन राहून विशेष महासभेची मागणी केली आहे.

महापालिका अधिनियमातल्या तरतुदीनुसारच आम्ही ही मागणी केली आहे. आपण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आणि महापौर आहात. मागील पाच वर्षांत आपल्या पक्षाने सभाशाखेचे कोणतेही नियम पाळले नाहीत. मनासारख्या सभा चालविल्या, अधिनियमाचे पालन केले नाही. विशेष हितसंबंधांचे तसेच पाहिजे ते विषय अक्षरशः रेटून नेले. या सर्व बाबी विरोधी पक्ष म्हणून आम्ही तसेच शहराच्या सजग जनतेने अनुभवल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला या शहरातील मतदार नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील, याचा आम्हाला विश्वास आहे.

आम्ही आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की, आमच्या पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी केलेल्या विशेष महासभेच्या मागणीबाबत आपण गांभीर्याने विचार करून ही सभा तात्काळ बोलवावी, जेणेकरून शहरातील जनतेसमोर वस्तुस्थिती जाणे अत्यंत गरजेचे आहे. या सभेमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीतील सव्वा सहा कोटींचा भ्रष्टाचार, कोविडच्या खरेदीत झालेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार, स्पर्श प्रकरण, शिक्षक भरतीमधील भ्रष्टाचार, पर्यावरण विभागातील निविदा प्रक्रियेत कोट्यवधींची अनागोंदी करून स्वत:ची घरे भरणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे खरे चेहरे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. आमच्या सदस्यांच्या मागणीचा विचार करून आपण महासभेचे आयोजन न केल्यास आम्हाला महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवडणूक प्रमुख तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.