Vehicle Robbery : दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यास यश

9.45 लाख किमतीच्या 17 मोटार सायकली हस्तगत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड , गुन्हे शाखा युनिट 1 ने धडाकेबाज कारवाई करत मोटार सायकल चोरणारी (Vehicle Robbery) आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 मोटरसायकल या टोळीकडून जप्त केल्या आहेत. शहरात दिवसेंदिवस वाहन चोरीच्या प्रकरणांना चाप लावण्यासाठी शहरात युनिट 1 ने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीस (Vehicle Robbery)  आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या सुचनेस अनुसरून गुन्हे शाखा युनिट 1 ने दुचाकी गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचला आणि तात्काळ कारवाईचा धडाका सुरू करून चोरलेल्या मोटार सायकल जप्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथक आरोपींच्या मागावर असताना एका मोटार सायकलवरून तीन व्यक्ती संशयीतरित्या खेड कडून येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच दुचाकीचा वेग वाढवून तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांनी शिताफिने पकडले.

या कारवाईत प्रज्वल प्रताप देशमुख (वय – 20 वर्षे , रा . वरवटे मळा,संगमनेर ) आणि अक्षय लहानु जाधव (वय – 27 वर्षे, रा. बटवाल मळा , संगमनेर) या दोन दुचाकी चोरांना अटक केली, तर तिसऱ्याला पडण्यात अपयश आले.

संशयास्पद वागणुकीमुळे युनिट 1 ने त्यांना कार्यालयात आणले, त्यांची चौकशी सुरू केली मात्र सुरवातीला त्यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दरम्यान सखोल चौकशीअंती ताब्यात असलेली मोटार सायकल त्यांनी म्हाळुंगे , चाकण परीसरातुन चोरी केल्याचे सांगितले.

Rahul Parge : श्री डोळसनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहुल पारगे यांची बिनविरोध निवड

याप्रकरणी आणखी तपास करीत असताना पोलिसांनी देशमुख आणि जाधव यांचे साथीदार तुषार फटांगरे (रा . संगमनेर , जि . अहमदनगर) व एक अल्पवयीन मुलगा यांना तात्काळ ताब्यात घेतले. या टोळीने पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नाशिक या परिसरातून मोटार सायकल चोरी (Vehicle Robbery)  करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली.

आरोपी हे संगमनेर येथे मोटार सायकल वरून पुणे नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफाटा व नाशिक परिसरात येऊन मोटार सायकल चोरी करून रातोरात परत जात असत आणि चोरलेल्या मोटार सायकल या परिचीत लोकांना कागदपत्र नंतर देतो असे अश्वासन देत तात्काळ विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

आरोपींकडून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना विकलेल्या एकूण 9 लाख 45 हजार रुपयांच्या 17 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये चाकण पोलीस ठाण्यात 7 गुन्हे, नारायणगाव पोलीस स्टेशन चे 2 गुन्हे आणि नाशिक road(नाशिक शहर) चे 3 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर खेड, आळेफाटा, लोणी आणि मुंबई नाका(नाशिक शहर) पोलीस ठाण्यात सुद्धा या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.

दरम्यान, अटक आरोपी अक्षय लहानु जाधव हा संगमनेर ग्रामीण पोलीसांच्या रेकॉर्ड वरील असून त्याचे विरूध्द वाहन चोरी व इतर चोरीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.