Run Waari 2022 : अनोखी ‘रन’वारी! 17 धावपटू अवघ्या 3 दिवसात पार करणार देहू – पंढरपूर अंतर

एमपीसी न्यूज – 17 उस्फुर्त धावपटू अवघ्या तीन दिवसांत पळत देहू – पंढरपूर असे 260 किमी अंतर अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करणार आहेत. अनोखी अशी ही रणवारी (Run Waari 2022) (उद्या) दि. 16 जून ते  19 जून दरम्यान पार पडणार आहे, अशी माहिती रनवारीचे प्रमुख भूषण तारक यांनी दिली आहे. रणवारीचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. 

नेमकी काय आहे ही संकल्पना?

दरवर्षी लाखो वारकरी पायीवारी करत देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतात, आपल्या लाडक्या विठुराच्या चरणी लीन होतात आणि समाधानाने त्यांची पावले पुन्हा घराकडे वळतात. ही परंपरा सुमारे 800 वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. कोरोना संकटाची दोन वर्षे वगळता प्रत्येक वारकरी आनंदाने दरवर्षी 260 किमीचे अंतर पायीवारी करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहोचतो.

दरम्यान, पायीवारी संकल्पनेला प्रेरीत भूषण तारक यांनी रनवारी (Run Waari 2022) सुरू केली आहे. या रनवारीचे वैशिष्ठ्ये सांगताना भूषण तारक म्हणाले, लहानपणापासून मला वारीचे विशेष आकर्षण होते, त्यामुळे लहानपणी 21 दिवसांची पायीवारी करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, परंतु इतके दिवस सलग शाळेला सुट्टी मिळत नसल्याने पायी वारी करता  आली नाही. पुढे काॅलेज आणि नोकरी करताना सुद्धा सुट्टीच्या कारणाअभावी वारीला आले नाही.

Santosh Khandge Birthday : कला, शिक्षण, सामाजिक उपक्रमांनी संतोष खांडगे यांचा वाढदिवस साजरा

दरम्यान, ही वारी आपण धावत पुर्ण करावी असे ठरले. ही कल्पना मित्रांना सांगितली, त्यांनासुद्धा ही कल्पना आवडली त्यामुळे पहिली रनवारी आम्ही 2021 मध्ये केली. या रनवारीत माझ्यासह सात जण सहभागी झाले होते असे तारक यांनी सांगितले.

अशी असेल ‘रन’वारी!

तारक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी रनवारीमध्ये (Run Waari 2022) 17 लोक सहभागी होणार आहेत. देहू – पंढरपूर असे 260 किमी अंतर धावत तीन दिवसांमध्ये पार करणार आहेत. त्यांच्याबरोबर 6 गाड्यांमध्ये 17 जण अत्यावश्यक सामग्री आणि फर्स्ट एड किट घेऊन सहभागी होणार आहेत.

रणवारी आज (दु. 1.30 वा) श्री क्षेत्र देहू येथून सुरु होणार आहे. याप्रसंगी एवरेस्टवीर उमेश झिरपे, प्रख्यात कीर्तनकार चारुदत्त आफळे, प्रख्यात धावपटू आशिष कसोडेकर, देहू संस्थानचे प्रमुख नितीन महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या रणवारीत विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या वेशभुषेत मुले सुद्धा सहभागी होणार आहेत, तसेच काही महिला नऊवारी साडी परिधान करून या वारीत आळंदी पासून दिघी पर्यंत धावणार आहेत.

ही वारी संध्याकाळी 5 वा. आळंदी येथील मुख्य मंदिरात पोहोचणार असून रात्री 1.30 वा दिवेघाटात पोहोचणार आहे. तिथे जेवण करून 15-20 मिनिटे विश्रांती केल्यानंतर जून 17 ला सकाळी 6 ते 6.30 वा पर्यंत ही रनवारी जेजुरी येथे पोहोचेल. तेथे नाष्टा करून लोणंद जवळील नीरा नदी किनारी धावपटू दुपारचे भोजन करतील. थोड्या विश्रांतीनंतर ते मार्गस्थ होऊन रात्री 9 ते 9.30 पर्यंत फलटण येथे पोहोचतील, अशा रीतीने सर्वजण जून 17 ला 140 किलोमीटर धावतील.

त्यानंतर सावतामाळी ट्रस्टच्या धर्माशाळेत ते रात्रीचे भोजन करतील आणि 3 तास विश्रांती घेतील. विश्रांतीनंतर पुन्हा पुढील प्रवासाठी निघतील व जून 18 ला सकाळी 6.30 – 7 वा ते नातेपोते येथे पोहोचतील. तेथे नाश्ता केल्यानंतर पुढे  माळशिरसला पोहोचून सर्वजण तेथे दुपारचे भोजन करतील. रात्री ते बंडि शेगाव येथे पोहचून भोजन करून पुढे मार्गस्थ होतील. जून 19 ला ते सकाळी 9 वा पंढरपूर येथे पोहोचतील आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेतील.

या रनवारीमध्ये भूषण तारक, अजित गोरे, अनिश हडवले, चंद्रकांत कट्टूल, चंद्रकांत पाटील, दत्ता खोत पाटील, जनार्धन कट्टूल, निलेश मिसळ, ओंकार पराडकर, प्रसाद करगांवकर, राजेभाऊ ढवळे, राजेंद्र शेळके, संतोष कोकरे, सिदगोंदा पाटील, सुनप्रीत सिंग आनंद, स्वामिनाथन श्रीनिवासन आणि विशाल ढोरे हे धावपटू यांचा सहभाग होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.