Bhosari News : आर्थिक फसवणूक प्रकरणी स्वप्नील बालवडकर यांना अटक करावी – सुनंदा हजारे

गृहमंत्री व पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज – तीन कोटी दहा लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी स्वप्नील बालवडकर यांना अटक करावी. अशी मागणी तक्रारदार सुनंदा हजारे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्वप्नील बालवडकर विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आठ दिवस उलटून गेल्यानंतर देखील आरोपीला अटक होत नसल्याने हजारे यांनी 21 एप्रिल रोजी निवेदनाद्वारे अटकेची मागणी केली आहे.

सुनंदा हजारे यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘स्वप्नील बालवडकर विरोधात 13 एप्रिल 2022 रोजी मी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून त्याच्याविरूद्ध 3 कोटी 10 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आठ दिवसानंतर देखील पोलीस आरोपीला चौकशीसाठी बोलवत नाहीत, त्यामुळे पोलीस या प्रकरणाच्या तपासाबाबत उदासीन दिसत आहे.’

हजारे यांनी निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, ‘बालवडकर यांचे पोलीस व राजकारणी यांच्याशी लागेबांधे आहेत. पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक न केल्यास हजारे कुटुंबीय आंदोलन करतील. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचे आम्हाला सहकार्य लाभले नाही. सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन देखील पोलीस कारवाईला टाळाटाळ करत आहेत.’ असा आरोप हजारे यांनी निवेदनात केला आहे.

दरम्यान, याप्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने स्वप्नील बालवडकर यांना अंतरिम जामीन दिला आहे. पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.