Talegaon Dabhade : विनाकारण फिरणाऱ्याची पोलिसांकडून अँटीजन टेस्ट,टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरला होणार रवानगी

सर्वांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

एमपीसी न्यूज :तळेगाव शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध  पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या 39 नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना समज देवून सोडून देण्यात आले.

मावळ तालुक्यात तळेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक समोर येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

तळेगाव नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून  नियम व निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लाॅकडाऊनची नागरिकांना तमा नाही.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध व नियमांच्या अंमलबजावणीची सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर तळेगाव स्टेशन चौक येथील चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली.

तळेगाव शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत.असे असतानाही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे बेशिस्त नागरिकांना चाप बसण्यास मदत होत आहे.

बेशिस्त नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी नियम व निर्बंध अधिक कडक करावेत, अशी सजग नागरिकांची मागणी आहे. कोरोनाच्या पार्श्व भूमीवर नागरिकांनी शासकीय नियमांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

भास्कर जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे

” कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आले असून, नियमांची अंमलबजाणी करण्यात येत आहे. त्याचे नागरिकांनी पालन करून खबरदारी घ्यावी, सुरक्षेच्या साधनांचा वापर करावा, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. अत्यावश्यक सेवेतील कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोना महामारीला थोपविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्या बाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.