Rahul Bajaj : …आणि राहुल बजाज यांच्या आठवणी सांगताना जेष्ठ कर्मचाऱ्याला झाले अश्रू अनावर 

एमपीसी न्यूज – जेष्ठ उद्योगपती पद्म विभूषण राहुल बजाज यांचे शनिवारी (दि.12) दुपारी पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी कंपनीतील निवासस्थानी आकुर्डी येथे ठेवण्यात आले आहे. अनेक राजकीय नेते, उद्योगपती यांनी बजाज यांना निवासस्थानी येऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नातेवाईक, सहकारी व कंपनीतील आजी माजी कर्मचाऱ्यांनी देखील बजाज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली होती. 

बजाज ऑटो कंपनीचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी रवी कुमार यांनी यावेळी उद्योजक राहुल बजाज यांच्या आठवणींना उजाळा दिला. बजाज यांच्या आठवणी सांगताना रवी कुमार यांच्या भावनाचा बांध फुटला व त्यांना अश्रू अनावर झाले.

रवी कुमार म्हणाले, ‘मनाची आणि विचारांची श्रीमंती असलेले राहुल बजाज मी जवळून पाहिले आहेत. माणूस म्हणून अतिशय ग्रेट व्यक्तिमत्त्व होते. सुरवातीला मी जेव्हा नवीन आलो त्यावेळी मला समजून घेऊन कामाची संधी दिली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करत राहिलो.’

रवी कुमार पुढे म्हणाले, ‘कंपनीतील कामगार असो किंवा संघटनेचा विषय असो सर्वच विषय त्यांनी संयमाने आणि सर्वांना विश्वासात घेऊन सोडविले. कुणीही असो त्याला माणूसपणाची वागणूक देणं ही त्यांची प्राथमिकता असायची. ते एक यशस्वी उद्योजक तर होतेच पण लिडर आणि अतिशय चांगले माणूस पण होते. त्यामुळे त्याचं निधन आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे.’

सध्या राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीत ठेवण्यात आले आहे. पुण्यात त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘मेरी आवाज ही पहचान है’… पाहा संपूर्ण कार्यक्रम!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.