Pimpri news: आता ऑक्सिजन पुरवठादार वाहनांवर राहणार ‘एस्कॉर्ट’ टिमचे लक्ष

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून सद्यस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. या ऑक्सिजन सिलिंडर, पुरवठा करणा-या वाहनांवर देखरेख आणि नियंत्रणासाठी महापालिकेने ऑक्सिजन एस्कॉर्ट टिमची स्थापना केली आहे. त्यात पोलीसांचाही समावेश करण्यात आला आहे. हे पथक अहोरात्र या वाहनांवर देखरेख ठेवणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या पाच हॉस्पिटल्ससाठी 55 टन ऑक्सिजन रोज लागतो. जम्बो कोविड रुग्णालयासाठी 25 टन ऑक्सिजनच्या दैनंदिन पुरवठ्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार, जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या महापालिका सतत संपर्कात आहे. आतापर्यंत व्हेंडर्सकडून ऑक्सिजन उपलब्ध करुन मागणी पूर्ण केली जात आहे. मात्र, दोन दिवसांपासून ऑक्सिजनच्या कृत्रिम तुटवडा जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ऑक्सिजन व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. त्यात उपायुक्त स्मिता झगडे यांची प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने आता ऑक्सिजन एस्कॉर्ट टीमही मैदानात उतरविण्यात आली आहे.

त्यात उपअभियंता सुनीलदत्त नरोटे, नितीन निंबाळकर, सुनिल शिंदे यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांचासमवेत फौजदार, सहायक पोलीस निरीक्षक , हवालदार यांचाही समावेश आहे. हे पथक अहोरात्र कामकाज करणार आहे. या पथकासाठी तीन वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही एस्कॉर्ट टीम ऑक्सिजन पुरवठा करणा-या वाहनांवर देखरेख व नियंत्रण ठेवणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.