India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक 

एमपीसी न्यूज –  देशात गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासांत 45 हजार 333 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 38 हजार 772 कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्या आत आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94 लाख 31 हजार 692 एवढी झाली आहे. त्यापैकी 88 लाख 47 हजार 600 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 4 लाख 46 हजार 952 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 443 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 37 हजार 139 जण मृत्युमुखी पडले आहेत. देशाचा रिकव्हरी दर चांगला असून तो 93.80 टक्के एवढा आहे तर, मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. देशात चौदा कोटी चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला असून, आतापर्यंत 14 कोटी 03 लाख 79 हजार 976 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, मागील 24 तासांत देशभरात 8 लाख 76 हजार 173 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा व छत्तीसगड या देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. तर, याच आठ राज्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. जगात भारत सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी देशाचा रिकव्हरी दर इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.