Shirgaon News : या कंपनीत फक्त आमच्याच गाड्या माल भरणार ; कंपनीतील माल भरण्यासाठी आलेला ट्रक अडवून धमकी 

सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – उर्से येथील एका कंपनीतील माल भरण्यासाठी औरंगाबाद आणि हडपसर येथून ट्रक आले. ते  ट्रक कंपनीत जात असताना सात जणांनी मिळून ते ट्रक अडवले. ट्रक कंपनीत जाऊ न देता तसेच कंपनीतील माल भरू न देता धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी तीन वाजता घडली.

स्वप्नील सुरेश कारके (वय 31), रहीस युनिस शेख (वय 31), रोहीस रामश कारके (वय 22), देविदास चिमाजी सावंत (वय 44), अविनाश उत्तम गायकवाड (वय 30), सोमनाथ ज्ञानेश्वर सावंत (वय 37) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह लालचंद निवृत्ती गायकवाड (सर्व रा. उर्से, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेमंत श्री गोपाळ शर्मा (वय 48, रा. वराळे, ता. मावळ) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से येथील द सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या मेनगेटवर कंपनीमध्ये औरंगाबाद आणि हडपसर येथून कंपनीतील माल भरण्यासाठी दोन ट्रक आले होते. ते ट्रक मेनगेटवरून कंपनीत जात असताना आरोपींनी ते दोन्ही ट्रक अडवले.

‘कंपनीच्या आत गाडी घेऊन जायची नाही. या कंपनीत आमचे ट्रान्सपोर्ट आहे. आमच्या गाड्या कंपनीतील माल भरणार. तुम्ही बाहेरून गाड्या कशा काय घेऊन आला. तुम्ही जर आतमध्ये गाड्या घेऊन गेलात तर तुम्ही बाहेर आल्यावर तुमच्याकडे बघतो. तुमच्या गाड्या फोडून टाकतो. तुमचे हातपाय तोडू’ अशी आरोपींनी धमकी दिली. दोन्ही ट्रक मेनगेटवर अडवून कंपनीतल माल भरू दिला नाही असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.