Pimpri News : पुणे-मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; एक तास ट्राफिक जॅम

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये तीन कारचा अपघात झाला. यात कुणीही जखमी झाले नाही. वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, या अपघातामुळे पिंपरी चौकात एक तासभर ट्राफिक जॅम झाले.

मंगळवारी (दि. 21) सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक कार पुण्याकडून निगडीच्या दिशेने जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात होती. पिंपरी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये त्या कार चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्याच्या मागून येणा-या दोन कार पहिल्या कारवर आदळल्या. या अपघातात रस्ता बंद झाला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघाताच्या घटनेमुळे ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली. याचा सेवा रस्त्यावरील वाहतुकीवर ताण पडला आणि वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ग्रेड सेपरेटरमधील वाहने बाजूला केली आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

सेवा रस्त्यावरील वाहनांच्या रांगा वाढल्याने वाहतुकीवर ताण पडला. एक तास ही वाहतूक खोळंबलेली होती. वाहतूक पोलिसांनी सेवा रस्त्यावरील वाहतूक देखील सुरळीत केली आहे.

दरम्यान, मेट्रोचे काम सुरु असल्याने मोरवाडी ते पिंपरी चौक दरम्यान रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे देखील या रस्त्यावर वाहतूक नेहमी खोळंबलेली असते.

पिंपरी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे म्हणाले, “सकाळी दहा वाजताच्या सुमारास ग्रेड सेपरेटरमध्ये तीन वाहनांचा अपघात झाला. यामुळे वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.