Eknath Shinde : वेदांता–फॉक्सकॉनवरून वातावरण तापलं; मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन

एमपीसी न्यूज – वेदांता–फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलविल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

या चर्चेदरम्यान,महाराष्ट्राला उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्राच्या वाटेचा वेदांता-फॉक्सकॉन गुजरातच्या वाटेवर गेल्यानंतर शिंदे यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर केंद्रातून सूत्र हालविली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संबंधित प्रकल्पावरून मोदी आणि शिंदेंमध्ये सुमारे अर्धातास चर्चा झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शिंदेंनी महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणूकीबाबत सहकार्य करा अशी विनंती मोदींकडे केल्याची चर्चा आहे.

म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही

एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांतचे मालक अनिल अग्रवाल,फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील असे सांगण्यात आले होते.

तसेच, तळेगावजवळील 1100  एकर जमीनही देण्यात आली होती. 30 ते 35 हजार कोटींची सवलतही सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने देण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॅन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.