Vilas Madigeri : प्रभाग रचनेविरोधातील याचिकेवर उद्या अंतिम सुनावणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेविरोधातील याचिका मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्त यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या गुरुवारी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी (Vilas Madigeri) यांनी दिली.

प्रभागरचनेसंदर्भात वारंवार लेखी तक्रारी व हरकती घेऊन देखील पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्य निवडणूक यंत्रणा यांच्याकडून कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे विलास मडिगेरी यांनी महानगरपालिकेच्या प्रभागरचनेला  उच्च न्यायालयात आव्हान दिले.  या याचिकेवर मागील सुनावणीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह सर्व प्रतिवादी यांना 8 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश यायालयाचे दिले होते.
त्याप्रमाणे आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय आहुजा व न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या  खंडपीठासमोर सुनावणी झाली.

आज झालेल्या सुनावणीमध्ये समाविष्ट असलेल्या एक जनहित याचिका व दोन याचिकांमध्ये (Writ Petition ) समान मुद्दे असल्यामुळे या सर्व याचिका जनहित याचिकेसोबत मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्त व मकरंद कर्णिक यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यावर उद्या गुरुवार अंतिम सुनावणी होणार आहे.

Unauthorized Construction : महापालिकेची अनधिकृत बांधकाम, पत्राशेडवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई!

या दरम्यान राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार राज्य शासनाची दुटप्पी भूमिका उघड झालेली आहे. ओबीसी आरक्षण महानगरपालिका निवडणुकीत लागू करण्याच्या हेतूने 11 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र विधी मंडळाने महानगरपालिका प्रभागरचना ठरविण्याच्या कायद्यात बदल केला होता. परंतु, विधीमंडळात केलेल्या बदलांना बगल देऊन आणि सदर कायद्यास सर्वोच्च न्यायालयात कोणतेही स्थगिती आदेश नसताना न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून सोयीस्कररित्या राज्य सरकारने ओबीसी आरक्षण टाळण्यासाठी कायद्याविपरीत, राज्य निवडणुक आयोगास घाईघाईत प्रभागरचना करून निवडणूक घेण्यासाठी राज्य शासन सहाय्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे त्यांनी केलेल्या चुका व नियमबाह्य कारभार उघड होणार असून न्यायालयाकडून अंतिम सुनावणीमध्ये न्याय मिळेल, अशी अपेक्षा मडिगेरी (Vilas Madigeri) यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.