Wakad : खून प्रकरणातील आरोपीला वाकड पोलिसांनी केली चार तासात अटक, फिरस्ता व लहान मुलामुळे लागला आरोपीचा सुगावा

एमपीसी न्यूज – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला वाकड पोलिसांनी (Wakad) अवघ्या चार तासात अटक केली. ही कारवाई करण्यासाठी महत्त्वाची माहिती एका फिरस्त्याने व एका लहान मुलाने पोलिसांना पुरवली. शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

अनिकेत उर्फ सनी रमेश काळे (वय 26 रा.मुंबंई) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर त्याने योगेश जगन्नाथ सुर्वे (वय 40 रा. रहाटणी) याचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खून केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी काळेवाडी फाटा (Wakad) येथे मारहाण झालेली व्यक्ती औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी त्याचा बुधवारी (दि.6) रात्री दहा वाजता मृत्यू झाला. यावरून वाकड पोलीस ठाण्यात मारहाणीचे कलम बदलून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Madhav Bhandari : भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’- भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र मयताची ओळख काही पटत नव्हती. यावेळी एका फिरस्त्याने मयत हा चालक असून तो याच भागात राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तो चालक म्हणून काम करत असलेल्या ठिकाणी माहिती मिळवली असता त्याचे नाव कळाले व तो विवाहीत होता, मात्र तो कामानिमित्त एकटाच बाहेर फिरुन मिळेल तिथे वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना कळाले.

त्याचाबाबत अधिक माहिती काढली असता, पोलिसांना माहिती मिळाली की, तो गजानन नगर येथे रहात होता. यावेळी त्या परिसरात जाऊन पोलिसांनी मयताचा फोटो दाखवून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी रहिवाशी काही ठोस महिती देऊ शकले नाहीत. यावेळी तेथे खेळत असलेला लहान मुलगा चौकशी पाहून तेथे आला व त्याने मयताला ओळखले व त्याने मयताचे सनी सोबत भांडण झाल्याचे सांगितले.

यावेळी सनीचा भाचा हा त्याच्या सोबत खेळायला येत होता सांगितले, मात्र त्याला त्याचे पूर्ण नाव माहिती नव्हते. पोलिसांनी आरोपीच्या भाच्याचे घर अखेर शोधून काढले. यावेळी आरोपीच्या बहिणीने आरोपीचे कोणासोबत तरी भांडण झाले होते व त्यानंतर तो मुंबईला निघून गेला, अशी माहिती दिली. यावेळी पोलिसांनी मुंबई येथे जाऊन आरोपीला अटक केली. यावेळी सनीने गुन्हा कबूल करत त्यांच्या शिवीगाळ करण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले.

यात सनीने मयताच्या पोटात लाथा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे कबूल केले. शवविच्छेदन अहवालानुसार योगेश यांचा मृत्यू हा पोटातील आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याने झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने मंगळवार (दि.13) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, रोहित दिवटे, सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार संदीप गवारी, वंदु गिरे, स्वप्निल खेतले, पोलीस हवालदार दीपक साबळे, आतिश जाधव, अजय फल्ले, पोलीस शिपाई भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित (परिमंडळ -02) यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.