Nigdi News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांसाठी तरुणांनी पुढे यावे – शरद पोंक्षे

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मांडलेल्या स्वातंत्र्याविषयीच्या विचारांची महती शंभर वर्षानंतर देखील पटते. देशभक्ती, राष्ट्रभक्ती साठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार रुजवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी व विचार प्रवर्तक शरद पोंक्षे यांनी सोमवारी (28 फेब्रुवारी) रोजी निगडी प्राधिकरण येथे मांडले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मसमर्पण दिनानिमित्त नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या वतीने आयोजित ‘सावरकर विचार दर्शन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री राधिका देशपांडे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप सरचिटणीस विजय शिनकर, नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.

शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जिवनातील विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांच्या जिवनात शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कार्याचा असलेला वैचारिक पगडा ते स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीची विविध उदाहरणे मांडली. अहिंसा आणि शस्त्राचे महत्व यावरही त्यांनी भाष्य केले. स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी, अश्पृश्य़ता निवारणासाठी कार्य केले. त्यांची देशभक्तीची अनेक उदाहरणे  आहेत. परंतु, देशात काही मंडळींनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी समाजात असंतोषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मिला बाबर यांनी केले. चंद्रशेखर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.