Nigdi News : पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चिकन तोडण्याच्या सत्तूरने 32 वार

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाला एकाने पैसे मागितले. पैसे देण्यास तरुणाने नकार दिला. या कारणावरून पैसे मागणार्‍याने शेजारी असलेल्या चिकनच्या दुकानातून चिकन तोडण्याचा सत्तूर आणला. त्या सत्तूरने तरुणावर 32 वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 17) सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोर आकुर्डी येथे  सकाळी घडली.

नबीन दानबहादुर कुंअर (वय 26, रा. भेळ चौक, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय पुरुषोत्तम जाधव (वय 26, रा. आकुर्डी गावठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नबीन हे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास आकुर्डी येथील सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोरील रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी अक्षय याने त्यांना आवाज दिला आणि पैशांची मागणी केली.

मात्र फिर्यादी यांच्याकडे पैसे नसल्याने फिर्यादी यांनी आरोपी अक्षय याला पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून अक्षय याने शेजारीच असलेल्या चिकनच्या दुकानामधून चिकन तोडायचा लोखंडी सत्तूर आणला. त्याने फिर्यादी यांच्या डाव्या खांद्यावर 22 तर डाव्या हातावर 10 असे एकूण 32 वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.