Ajit Pawar : कुणाचं बटन दाबायचे ते बारामतीकरांना ठाऊक – अजित पवार

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून भाजपच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा म्हणजे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीचा हा गड मानला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपुर्वी बारामतीमध्ये जाऊन भाजप 2024 मध्ये बारामती जिंकणार, असा निर्धार व्यक्त केल्यामुळे त्यावरुन राजकीय चर्चा सुरु झाली आहे.याबाबत शुक्रवारी पुण्यात बोलताना अजित पवार यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच 2019 ची एक आठवण करुन देत खोचक टोला देखील लगावला आहे.

बारामतीकरांना कुणाचं बटन दाबायचे हे चांगलं माहितीये, अशी उपहासात्मक टिपण्णी त्यांनी यावेळी केली. आम्हाला काहीही वाटत नाही, असे खूप जण येतात आणि लक्ष्य करतात. गेल्या 55 वर्षांत असे किती तरी जण आले आणि किती तरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगल माहितीये की कुणाचं बटन कशा पध्दतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावितील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असे अजित पवार म्हणाले.

बारामतीती माझं काम बोलतं

बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील, अस देखील अजित पवार म्हणाले.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसेत ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यावर त्यांना एक हुरुप येतो. आपण काही तरी करतो वगैरे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिध्दी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांचा दौरा प्रसिध्द झाला, असा टोला पवारांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.