Khadki Cantonment : खडकी कॅन्टोंन्मेटच्या हद्दीतील जुन्या पुणे- मुंबई रस्ता रुंदीकरणास सुरुवात

एमपीसी न्यूज : जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी रेल्वेस्थानकासमोरील (Khadki Cantonment) अरुंद रस्त्याच्या रुंदीकरणास संरक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली आहे. यानंतर महापालिकेनेही तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली असून बोपोडी येथील हॅरीस ब्रिजपासून खडकी कॅन्टोंन्मेंट हद्दीतील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी सुमारे 40 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आता खडकीतील या रस्त्यावरील गेल्या अनेक वर्षाची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
 महापालिकेने 2016 मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील बोपोडी येथील हॅरीस ब्रिजपासून खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील रेंजहिल्स चौकापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या रस्त्याच्याकडेला बोपोडी येथे राहाणार्‍या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु खडकी रेल्वे स्टेशनपासून रेंजहिल्स चौकापर्यंतची रस्त्याच्या कडेला असलेली संरक्षण विभागाची जागा मिळत नसल्याने रस्ता रुंदीकरण रखडले होते. विशेष असे की खडकी रेल्वे स्टेशनमुळे रस्त्याच्या विरूद्ध दिशेच्या जागेशिवाय रुंदीकरणासाठी पर्याय नव्हता. दरम्यान, स्वारगेट- पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गही याच रस्त्यावरून जाणार असल्याने भूसंपादना अभावी मेट्रोचेही काम रखडले होते. त्यांनाही संरक्षण विभागाच्या जागेची गरज होती.

या दोन्ही प्रकल्पांसाठी 10 एकर जागेची  (Khadki Cantonment) गरज असून तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या जागेच्या बदल्यात येरवडा येथील महापालिकेची तेवढीच जागा संरक्षण विभागाला देण्याची तयारी दर्शविली होती. यावर मागील आठवड्यात संरक्षण विभागाने निर्णय घेत रस्ता रुंदी करण व मेट्रोसाठीही जागा देण्यास मान्यता दिल्याने रस्ता रुंदीकरणासोबतच मेट्रोच्या कामातील महत्वाचा अडथळा दूर झाला आहे.
महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दोनच दिवसांपुर्वी या जागेची पाहाणी केली. 2016 मध्ये रस्त्याच्या कामाची निविदा ज्या ठेकेदाराला मिळाली होती, त्याने मागील पाच वर्षातील दरवाढीनुसार काम करणे शक्य असल्याचे कळविले. त्यामुळे प्रशासनाने या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला असून 40 कोटी रुपयांचे एस्टीमेटही तयार केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.