Pune Crime News : पुण्यात पहाटे-पहाटे दरोडा, महिलेच्या कानातील दागिने नेले ओरबाडून 

एमपीसी न्यूज –  पुण्यातील उरुळी कांचन परिसरात पहाटेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी एका घरावर सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी एका महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. या घटनेत ही महिला जखमी झाली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेबी महादेव उर्फ बळी कांचन (वय 46) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरळीकांचन परिसरातील पांढरस्थळ वस्ती या ठिकाणी हे कानशील कुटुंबीय राहतात. रविवारी रात्री ते स्वयंपाक खोली शेजारील घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरात पाच दरोडेखोरांनी खिडकीतून प्रवेश केला. घरात झोपलेल्या कांचन दांपत्याला उठवले आणि चाकूचा धाक दाखवून घरातील सर्व दागिने व रोख पैसे काढून ठेवण्यास सांगितले, परंतु त्यांच्या हातात घरातील काहीही लागले नाही.

यानंतर दरोडेखोरांनी कांचन दाम्पत्याला मारहाण केली तसेच फिर्यादी यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. या झटापटीत फिर्यादी यांच्या हातावर चोरट्यांनी चाकूचे वार देखील केले. यावेळी फिर्यादी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर कांचन कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.