Talegaon Dabhade News : डॉ. डांगे यांच्या फसवणूक प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचा आयुक्तांचा आदेश

तत्कालीन तपास अधिकाऱ्याकडे मागितला खुलासा

एमपीसी न्यूज – एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने एका कंपनीच्या संचालकांनी तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र, तत्कालीन तपास अधिका-यांमुळे डॉ. डांगे यांना न्याय मिळाला नाही.

याबाबतची तक्रार डॉ. डांगे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली. या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा तसेच तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांचा कसुरी अहवाल घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.

मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीच्या संचालकांनी सन 2014-15 साली तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची एक कोटी आठ लाख 78 हजार 660 रुपयांची फसवणूक केली. यात डॉ. डांगे यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. कंपनीच्या संचालकांनी डॉ. डांगे यांचे जगणे मुश्कील केले. याप्रकरणी डांगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सन 2018 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांच्याकडे होता. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास न करता डॉ. डांगे यांची दिशाभूल करून गुन्ह्याची कागदपत्रे क समरी मंजुरीसाठी न्यायालयात सादर केली. ही क समरी डॉ. डांगे यांना मंजूर नाही. या गुन्ह्याचा पुन्हा तपास व्हावा, यासाठी डॉ. डांगे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. डांगे यांच्या फसवणुकीचा गुन्हा पुन्हा तपासावर घेण्यासाठी न्यायालयात पत्रव्यवहार करावा. गुन्ह्याची सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करावीत. डॉ. डांगे यांचा पुरवणी जबाब घेऊन या गुन्ह्याचा पुन्हा तपास करावा, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला नाही. डॉ. डांगे यांची दिशाभूल करून या गुन्ह्याची कागदपत्रे क समरी मंजुरीसाठी न्यायालयात सादर केली. त्यामुळे तपास अधिकारी बाजगिरे यांचा याबाबत खुलासा घेऊन कसुरी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्याचे देखील आयुक्तांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना सांगितले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. या प्रकरणी डॉ. डांगे यांनी मानवाधिकार आयोगाकडे देखील तक्रार नोंदवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.