Wakad News : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली 20 लाखांची खंडणी  

उच्च शिक्षित खंडणीखोर महिलेस अटक

एमपीसी न्यूज – व्हाट्सअप चॅट, मेसेज असल्याचे सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी सापळा लावून खंडणीखोर महिलेला अटक केली आहे. ही घटना शिवार चौक, रहाटणी येथे घडली.

सविता अभिमान सूर्यवंशी (वय 38, रा. ताडीवाला रोड झोपडपट्टी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सखाराम नारायण नखाते (वय 54, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सविता हिचे बीकॉम पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सविता हिने फिर्यादी नखाते यांना त्यांच्यात झालेले व्हाट्सअप चॅटिंग, मॅसेजेस असल्याचे सांगितले. ते मेसेजेस फिर्यादी यांच्या घरी, त्यांच्या सोसायटीतील लोकांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. मुलींना फसवतो, अशी सोशल मीडियावर बदनामी करेल, असेही सविता हिने नखाते यांना सांगितले.

स्वतः आत्महत्या करून गुन्ह्यामध्ये गुंतविन, अशी धमकी देत प्रकरण मिटविण्यासाठी नखाते यांच्याकडे तिने 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली. नखाते यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शिवारचौक, रहाटणी येथे सापळा लावून 20 लाख रुपयांपैकी 12 लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी सविता हिला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.