Dr. Sadanand More : चिंतनशीलता हे कवितेचे मूल्य

एमपीसी न्यूज – कवितेचे अनेक प्रकार (Dr. Sadanand More) असतात. परंतु समता आणि स्वातंत्र्याची रूजवण करणारी चिंतनशील कविता हे कवितेचे खरे मूल्य आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि माजी संंमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
आडकर फाउंडेशन आणि काॅन्टिनेन्टल प्रकाशन यांच्या सयुंक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात डॉ. संभाजी मलघे संपादित उद्धव कानडे यांची चिंतनशील कविता ‘समतेचा ध्वज’ या ग्रथांचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी,  महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर,  आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, काॅन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, पुस्तकाचे संपादक डॉ. संभाजी मलघे, लेखक उद्धव कानडे आदी  (Dr. Sadanand More) मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, टोप्या उडविणाऱ्या कवितेपेक्षा चिंतनशील कविता रसिकांना भावते. कविता आणि चिंतनशीलता या एकत्र कशा नांदू शकतात, असा प्रश्न एखाद्यावेळी पडू शकतो. परंतु, महाराष्ट्राला चिंतनशील कवितेची दीर्घ परंपरा आहे. चिंतनशील कविता स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांना धरून प्रवास करीत असते. तसे पाहिले गेले तर स्वातंत्र्य आणि समतेमध्ये स्वातंत्र्य हे मूल्य नसून उर्मी आहे. प्रत्येक जण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि ते स्वाभाविक आहे. स्वातंत्र्य ही वैयक्तीक उर्मी असून समता ही एकपेक्षा जास्त व्यक्तींची मूल्ये जपणारी संकल्पना आहे. समता आणि स्वातंत्र्य या दोन मूल्यांमध्ये सातत्याने संघर्ष दिसून येतो.  भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्य या मूल्याची तळी उचलतात, तर साम्यवादी, समातावादी लोक समता या मूल्याला प्राधान्य देतात. समता आणि स्वातंत्र्य यांच्यातील संघर्ष हा माणसाच्या जीवनातील मुलभूत संघर्ष आहे.

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, सध्या एकाच कवितेवरून कवीचे मूल्यमापन केले जाते. कवी आपल्या एकूण काव्य प्रवासात  जीवनमूल्यांशी आणि विचारधारांशी  प्रामाणिक राहिला का हे तपासून पाहणे हेही तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी त्याच्या समग्र कवितेचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. समग्रता हे एक मूल्य आहे. त्याच्या अभावामुळे आज एकांगीवृत्ती फोफावताना दिसते. समता हे मूल्य प्रस्थापित होण्यासाठी एकमेकांविषयी ममता वाटणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये आचरणात आणली पाहिजे. या दृष्टिकोनातून डॉ. मलघे  यांचे लेखन महत्त्वाचे ठरते
यावेळी (Dr. Sadanand More) महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. संभाजी मलघे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. कवी उद्धव कानडे यांनी लेखन प्रक्रीया उलगडली. काॅन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन बंडा जोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.