Pune News : पोलीस चौकीतच कुटुंबाचा राडा, पोलिसांच्या अंगावर जात कागदपत्र फाडली, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरात एका कुटुंबाने पोलीस चौकीत धिंगाणा घालत, पोलिसांच्या अंगावर धावून जात पोलीस चौकीतील महत्त्वाची कागदपत्र फाडली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी हा प्रकार घडला.

रवींद्र संताराम उन्हाळे (वय 32) रामदास संताराम उन्हाळे (वय 38) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर पूनम रवींद्र उन्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी उन्हाळे कुटुंबांना बोलवले होते. दरम्यान तिघे चौकशीसाठी वडगाव पोलीस चौकीत आल्यानंतर पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत होते. त्यावेळी आम्हाला कशाला बोलावले आमची चौकशी का करता असे म्हणत त्यांनी चौकीत गोंधळ घातला. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या हातातील गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्र फाडून टाकली.

त्यानंतर आरोपींनी स्वतःलाच मारहाण करून घेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व आंदोलन करण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.