Hinjewadi News : कॅब चालकाला चाकूच्या धाकाने लुटणा-या चार जणांना अटक

चार गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शनिवारी (दि. 13) रात्री पावणे दोन वाजता भूमकर चौकाजवळ घडली. यातील चार चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण एक लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सलमान साबीर शेख (वय 21), शुभम श्रीकांत जाधव (वय 19), प्रेम बालाजी पोतदार (वय 19), ललित हरिकेस करोटीया (वय 20, सर्व रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत बाळासाहेब कोंडीबा बंडगर (वय 28, रा. काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅब चालवतात. त्यांना शुक्रवारी रात्री प्रवासी भाडे आले. ते प्रवाशांना पुण्यातून घेऊन मुंबईला निघाले. रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास भूमकर चौकातून यु टर्न घेऊन सर्व्हिस रोडच्या कोप-यावर आले असता आरोपींनी दुचाकी कारला आडवी लावून कार थांबवली. त्यानंतर फिर्यादी बंडगर यांना चाकूचा धाक दाखवून खिशातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 15 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून फिर्यादी बंडगर यांचा 15 हजाराचा मोबाईल फोन आणि 600 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

त्यानंतर चोरट्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वाकड, सांगवी आणि पिंपरी परिसरात देखील जबरी चोरी केल्याचे सांगितले. चोरलेले चार मोबाईल फोन, त्यांच्याकडील पाच मोबाईल फोन, दोन दुचाकी असा एकूण एक लाख 11 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.