Sangvi News : गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून डॉक्टरची फसवणूक; तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगून एकाने डॉक्टरची फसवणूक केली. संबंधित डॉक्टरचा मोबाईल हॅक झाल्याची तक्रार डॉक्टरने कथित पोलीस निरीक्षकाकडे केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकाने  संबंधित डॉक्टरला राजकीय, वकील, पोलीस आणि डॉक्टरकी पेशातील काही डॉक्टर जीवे मारणार असल्याचे दाखवले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी  डॉक्टरकडून एक लाख 75 हजार रुपये घेत डॉक्टरची फसवणूक केली. हा प्रकार 7 जून ते 21 ऑगस्ट या कालावधीत जुनी सांगवी आणि बाणेर येथे घडला.

गणेश खोल्लम (रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. कल्पेश ओमकार पाटील (वय 39, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश खोल्लम हा तोतया पोलीस आहे. त्याच्याकडे बनावट बेडी आणि पोलीस ऑफिसर विकली या मासिकाचे ओळखपत्र आहे. त्या आधारे तो स्वतः पोलीस असल्याचे इतरांना भासवत असे.

त्याने फिर्यादी पाटील यांना सांगवी आणि बाणेर येथील एका  हॉस्पिटलमध्ये भेटून त्यांचा विश्वास संपादन करून तो पुणे पोलीस दलात गुन्हे शाखा युनिट चार येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून डॉ. पाटील यांनी त्यांचा मोबाईल हॅक झाला असून त्यांची माहिती बाहेर जात असल्याची तक्रार आरोपी खोल्लम याच्याकडे केली.

‘माझ्या स्टाफला फिल्डवर्क करण्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील’ असे म्हणून खोल्लम याने डॉ. पाटील यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले. काही दिवसानंतर ‘तुमचा मोबाईल हॅक करण्यामागे राजकारणी, वकील, पोलीस व तुमच्या डॉक्टरकी पेशातील काही डॉक्टर यांचा हात आहे. ते तुम्हाला कायमस्वरूपी संपवणार आहेत’, असे सांगितले.

आरोपीने डॉ. पाटील यांच्या ओळखीतील सात ते आठ लोकांची नावे देखील सांगितली. त्यामुळे फिर्यादी घाबरले. त्यांना घराच्या बाहेर पडायला देखील भिती वाटू लागली. त्यानंतर संधीसाधू आरोपी खोल्लम याने फिर्यादी पाटील यांना कथित धोका असलेल्या लोकांच्या नावाने वाॅरंट काढण्यासाठी साठ हजार रुपये लागतील असे सांगितले. तुमच्यावर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांनी मोटरसायकल लावलेली आहे.

‘आता आपल्याला माझ्या माणसांना फिल्डवर्क करण्यासाठी काही पैशांची गरज आहे’, असे म्हणून आरोपीने आणखी 50 हजार रुपये मागितले. फिर्यादी यांना कथित धोका असलेल्या लोकांची रावेत येथील एका रिसॉर्टवर मीटिंग सुरू असून ते फिर्यादी यांची समाजात अब्रू घालवणार आहेत. त्यामुळे फिर्यादी यांचे डॉक्टरकी पेशामध्ये मोठे नुकसान होणार आहे, अशी भीती घालून आणखी 15 हजार रुपये देण्यास फिर्यादी यांना भाग पाडले.

आरोपीने फिर्यादी यांच्याकडून एकूण एक लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र आरोपी हा तोतया असून तो आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपी खोल्लम याला बुधवारी रात्री अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.