Pimpri News : गुंठेवारी नियमितीकरणासाठी ‘एफएसआय’ निश्चित

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरात डिसेंबर 2020 पूर्वी झालेली गुंठवारीतील बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) आणि सामासिक अंतरे निश्चित केली आहेत. संबंधित नागरिकांकडून महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण व परवानगी विभागाने अर्ज मागविले आहेत.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार शहरात 31 डिसेंबर 2020 पूर्वी झालेली, गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. नियमितकरणासाठी बांधकाम कुठे व कोणत्या रस्त्यालगत आहे, त्यानुसार अ, ब, क, ड, इ व फ असे सहा झोन केले आहेत. त्यानुसार एफएसआय निश्चित केला आहे.

निवासी आणि वाणिज्य क्षेत्रातील व एफएसआयच्या मर्यादेत राहून केलेली व निर्देशांकापेक्षा अधिकचे बांधकाम स्वत: हटवले असल्यास उर्वरित बांधकामे नियमित केली जाणार आहेत. मात्र, नदी पात्रातील, निळ्या पूररेषेतील, आरक्षणे, रस्त्यांना बाधित, रेडझोन, बफर झोन, धोकादायक, सरकारी जागेवरील, शेती झोन, ना विकास झोन आणि नाला क्षेत्रातील बांधकामे नियमित केली जाणार नाहीत, असे बांधकाम परवाना विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

निवासी आणि वाणिज्य अशा मिश्र वापरासाठीचा (क झोन) एफएसआय वाणिज्य क्षेत्राच्या वापराच्या पटीत निश्चित केला आहे. निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (ड झोन) रस्त्याची रुंदी व इमारतींच्या उंचीनुसार वेगवेगळा आहे. तसेच, भूखंडाच्या क्षेत्रानुसार निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (इ झोन) त्यांच्या उंचीनुसार आणि सामासिक अंतराचा एफएसआय (फ झोन) बांधकामाचा प्रकार, इमारतींची उंची आणि  रस्त्याची रुंदी यानुसार वेगवेगळा आहे. तो एक मीटरपासून ते साडेतीन मीटरपर्यंत आहे.

झोन अ : गावठाण
बांधकामांचा एफएसआय
रस्ता रुंदी / निवासी / वाणिज्य
नऊ मीटरपेक्षा कमी / 2.40  /2.70
नऊ ते 18 मीटर / 4.16 / 4.68
18 ते 30 मीटर / 4.48 / 5.04
30 मीटरपेक्षा अधिक / 4.48/ 5.04

झोन ब : गावठाणाव्यतिरिक्त
बांधकामांचा एफएसआय (चार हजार चौरस मीटरपर्यंत)
रस्ता रुंदी / निवासी / वाणिज्य
9 मीटरपेक्षा कमी / 1.32  / 1.48
9 मीटरपेक्षा कमी पण, रेडिरेकनरपेक्षा 10 टक्के प्रीमियम भरल्यास / 1.76 / 1.98
9 ते 12 मीटर / 2.76 / 3.10
9 ते 12  मीटर पण, रेडिरेकनरपेक्षा 10 टक्के प्रीमियम भरल्यास / 3.20 / 3.60
12 मीटरपेक्षा अधिक रस्ते / 2.92/ 3.28
12 ते 15, 15 ते 24, 24 ते 30 व 30 मीटरपेक्षा मोठा भूखंड पण, रेडिरेकनरपेक्षा 10 टक्के प्रीमियम भरल्यास / 3.36  / 3.78

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.