Dehuroad News : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या महिलेला शिवीगाळ

एमपीसी न्यूज – भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत असलेल्या एका महिलेला दमदाटी व शिवीगाळ करून तिला अश्लील शब्दात बोलून विनयभंग केला. ही घटना 25 जून रोजी दुपारी देहूरोड येथे घडली.

याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 3) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान राणू घनवट (रा. आदर्शनगर, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला देहूरोड येथे मोकाट कुत्र्यांना खाद्य देत होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आला आणि म्हणाला “तू आमच्या गल्लीत यायचं नाही. आमच्या गल्लीतील कुत्र्यांना खायला घालायचं नाही.” असे म्हणून आरोपीने पीडित महिलेला दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच “इकडे ये तुला बोलायचं आहे” असे म्हणून हातवारे करत फिर्यादी यांचा पाठलाग केला. “तुझा व्हिडिओ काढून सगळ्यांना दाखवतो. आम्ही गाववाले आहोत”, असे म्हणत अश्लील शब्दात बोलून फिर्यादी यांचा विनयभंग केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.