Hinjawadi News : बेंगलोर मुंबई महामार्गावर पिकपची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कात्रज येथील डिलिव्हरी देऊन परत घरी येत असताना बेंगलोर मुंबई महामार्गावर पाषाण तळ्याच्या जवळ सुतारवाडी येथे एका पिकअपने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 2) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडला.

प्रफुल्ल मनोहर लाखपुरकर (वय 32, रा. पाषाण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर अनिल जगन्नाथ पाटोळे (वय 22, रा बाणेर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. अनिल पाटोळे यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकप (एम एच 22, ए एन 2809) चालक अंकुश रामभाऊ राठोड (वय 32, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिलिव्हरी बॉयचे काम करतात. शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचा मित्र मयत प्रफुल्ल हे कात्रज येथील डिलिव्हरी देण्यासाठी गेले. डिलिव्हरी दिल्यानंतर ते दुचाकीवरून बेंगलोर मुंबई महामार्गावरून घरी परत येत होते. रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास सुतारवाडी येथील पाषाण तळ्याच्या विरुद्ध बाजूला एका पिकपने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांना किरकोळ दुखापत झाली. तर त्यांचा मित्र प्रफुल्ल यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पिकप चालकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.