Hinjawadi News : भरधाव कारची रिक्षाला धडक; दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – वडील आणि मुलगा रिक्षातून जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये वडील आणि मुलगा या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. हा अपघात 1 एप्रिल 2021 रोजी सकाळी मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडला. जखमी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने याबाबत तीन जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप धनाजी ठोंबरे (वय 48, रा. हमालनगर, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, पुणे) आणि त्यांचा मुलगा अनिकेत ठोंबरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दिलीप ठोंबरे यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिल्वर रंगाच्या लान्सर कार (एम एच 12 / बीजी 4915) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी दिलीप ठोंबरे आणि त्यांचा मुलगा अनिकेत असे दोघेजण सुसगाव येथून रिक्षातून जात होते. त्यांची रिक्षा सुसगावच्या पुढे स्मशानभूमी जवळ आली असता एका कार चालकाने कार भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये  फिर्यादी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. तसेच रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघात झाल्यानंतर आरोपी कारचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता पळून गेला. त्यानंतर फिर्यादी यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उपचारासाठी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यामुळे त्यांनी याबाबत तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.